तरडगाव : (नवनाथ गोवेकर)
पतंग उडवण्यासाठी वापरात येत असलेला चायनीज मांजा वाहनधारकांच्या जीवावर बेतत आहे. रविवार दिनांक २२ रोजी तरडगाव ता. फलटण येथे मांजा कापल्याने नितीन दत्तात्रय शिंदे मु . पो. खामगाव (पाचसर्कल) (वय ४७) गंभीर जखमी झाले आहेत.केवळ दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला. चायनीज मांजाला बंदी असतानाही त्याची छुपी विक्री होत असल्याचे या घटनेनंतर उघड झाले आहे.
कमी पैशांत न तुटणाऱ्या चायनीज मांजाची सध्या क्रेझ आहे. तो पतंग उडवणाऱ्यांना आनंद देत असला तरी तो वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे. कमी जाडीचा मांजा डोळ्याला दिसत नाही. परिणामी मुख्य रस्त्यावरून जाताना वाहनधारक मांजा कापून ते जखमी होत आहेत.रविवारी नितीन शिंदे हे कोपर्डे वरून पाचसर्कल येथे घरी दुचाकीवरून जात होते. शिंदे तरडगाव येथील उड्डाण पुलावर आल्यानंतर अचानक त्यांना चेहऱ्यावर काही तरी कापल्याचे जाणवले. त्याने तत्काळ दुचाकी थांबवली. मात्र, तोपर्यंत ती रक्तबंबाळ झाले होते. रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्या हाताला २० टाके पडले आहेत. केवळ दैव बलवत्तर म्हणून नितीन शिंदे यांचा गळा व जीव बचावला.
तरी तरडगाव परिसरात चायनीज मांजा विक्री आणि वापर होत असून ती त्वरीत थांबवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.